प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं ४८ हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा – गया – दोभी महामार्ग, २४९ कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. रालोआ सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे, लोकांपर्यंत शांतता, सुरक्षा आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
वाहतूक, ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी ५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तरप्रदेशात कानपूर इथं ४७ हजार ५७३ कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यानच्या मेट्रो कॅरीडॉरला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल सैन्यदलाचं कौतुक केलं. तसंच ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, असं म्हणाले.