प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते ४६ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प प्रधानमंत्री राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पाअंतर्गत असलेला चिनाब पूल हा देशातला पहिला केबल-स्टेड अर्थात रज्जु रेल्वे पूल आहे. 272 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे-जोड प्रकल्प 44 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा पूर्णपणे विद्युत रेल्वे प्रकल्प असून त्यात 36 बोगदे आणि 943 पूल आहेत. नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंचीवर असलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंचावरचा कमानी रेल्वे पूल असून ज्याची ऊंची आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरनं जास्त आहे.
प्रधानमंत्री श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर आणि दुसरी श्रीनगर ते कटरा अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. यातली कटरा आणि श्रीनगर दरम्यानची वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून नियमित सुरू होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रकल्पांचं उद्घाटन इथल्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. तसंच जम्मू आणि श्रीनगर दरम्यान रेल्वे संपर्क सुधारेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नव्या वंदे भारत गाड्या आध्यात्मिक पर्यटनाला चालना देतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण करतील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल जम्मू रेल्वे स्थानाकाला भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली.