बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील रोमहर्षक सामन्यात भारतीय संघानं काल गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघावर ४ विरुद्ध एका गोलनं असा विजय मिळवत चौथ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
या विजयामुळं भारतीय हॉकी संघ पुढच्या वर्षी, २०२६ मध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या FIH पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. हॉकी इंडियानं प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपयांचं तर सामन्याच्या सहाय्यक चमूला प्रत्येकी दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
आशिया चषक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं आहे. भारतीय संघानं गेल्या वेळच्या चषक विजेत्या संघाला पराभूत केल्यानं हा विजय आणखी खास असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या अभिनंदनाच्या संदेशात म्हटलं आहे.