नैऋत्य मोसमी पावसानं आज मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, बेंगळुरूसह कर्नाटक, तमिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगण आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला. तसंच मिझोराम, आसाम आणि मेघालयाचा काही भाग आणि संपूर्ण त्रिपुरा, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातही नैऋत्य मोसमी पाऊस सक्रीय झाला. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेशाचे आणखी काही भाग, तसंच कर्नाटकाच्या उर्वरित भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
कर्नाटकाचे काही भाग, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अंदमान आणि निकोबार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज आहे. येते दोन ते तीन दिवस दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि राजस्थानात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. राजस्थानात उष्णतेची लाट आणि धुळीची वादळं येण्याचा अंदाज आहे.