केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुका संपल्यानंतर तयार होणारे विविध आकडेवारी विषयक अहवाल जलदगतीनं तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड ही एक नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली सुरू केली आहे. इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची स्वतःची मात्र कायद्यानं बंधनकारक नसलेली माहिती प्रणाली असेल. या माध्यमातून निवडणुकांनंतरची महत्त्वाची आकडेवारी संकलित केली जाईल. संशोधक, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना मतदारसंघनिहाय माहिती सुलभतेनं उपलब्ध व्हावी हा यामागचा हेतू असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
या इंडेक्स कार्डमध्ये उमेदवार, मतदार, मतदानाची टक्केवारी, मतमोजणीचा तपशील, पक्ष आणि उमेदवारांना मिळालेली मते, लिंगभावा नुसार मतदानाचं स्वरूप, प्रादेशिक स्तरावरचा फरक आणि राजकीय पक्षांची कामगिरी या आणि अशा स्वरुपाची माहिती मिळू शकणार आहे.
या नव्या तंत्रामुळे निवडणुकांनंतरचे अचूक अहवाल जलदगतीनं उपलब्ध होईल. या अहवालात राज्य तसंच मतदारसंघानुसार मतदारांचा तपशील, मतदान केंद्रांची संख्या, महिला मतदारांचा सहभाग, राष्ट्रीय तसंच राज्य पक्ष आणि नोंदणीकृत पक्षांची कामगिरी, विजयी उमेदवारांविषयीचं विश्लेषण, मतदारसंघनिहाय निकाल आणि एकत्रित सारांश अहवाल उपलब्ध होऊ शकणार आहे.