राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं करायच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. राज्यातल्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतीनं करा, राज्यातल्या महामार्गांची उभारणी, तसंच रस्त्यांचं जाळं दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभागानं नियोजन करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.
समृद्धी महामार्गाचं उर्वरित अंतिम टप्प्याचं आमणेपर्यंतचे ७६ किलेमीटर लांबीचे काम तत्परतेनं पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा, तसंच मंत्रालय परिसरात नविन सात मजली इमारत उभारण्याच्या कामाची सुरवात येत्या शंभर दिवसात करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
येत्या १०० दिवसात इतर मागास बहुजन कल्याण विभागानं करायच्या कामांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळं स्थापन केली आहेत. या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरीता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करावी, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्याबाबतही प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.