देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा निर्माण केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारनं ११ वर्षात युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यांसारख्या अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
रालोआ सरकारनं गेल्या ११ वर्षात विविध उपाययोजनांमार्फत तरुण पिढीला सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
भारतात जगातला सर्वात तरुण देश आहे. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येत युवकांचा मोठा वाटा आहे. सुमारे ६५ टक्के लोकांचं वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. या युवा वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक कौशल्ये, चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात तसंच त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळवून देण्यासाठी सरकार काम करत आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना लक्षणीय परिणाम दिसत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठीची अर्हता सुधारली आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण ३४ टक्के होतं, २०२४ मध्ये ५१ टक्के पेक्षा अधिक आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे गेल्या १० वर्षांत १ कोटी ६३ लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण मिळालं. रोजगाराच्या आघाडीवर, २०२२ मध्ये सुरू झालेल्या रोजगार मेळ्याद्वारे १५ राष्ट्रीय कार्यक्रमांतून सुमारे १० लाख नियुक्ती पत्रं वाटण्यात आली आहेत. दरम्यान, २०१७ पासून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्यांची संख्या साडेआठ कोटींहून अधिक झाली आहे. २०२० पासून ३ कोटी ४५ लाख तरुणांचा समावेश आहे. मुद्रा योजनेमधून लहान व्यवसायांना सुलभ कर्जासह पाठिंबा मिळाला आहे. या अंतर्गत, ३३ लाख कोटी रुपयांची ६ कोटी ६७ लाखांहून अधिक कर्जं मंजूर करण्यात आली. २०१६ पासून, स्टार्टअप इंडिया उपक्रमाने १ लाख ५९ हजारांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे, परिणामी १६ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या. उल्लेखनीय म्हणजे, यापैकी ७३, हजारहून अधिक स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे.